नाशिक : स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट आक्रमक झाला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. निवेदनात वारंवार होणारी पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील कथित भ्रष्टाचार, ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि पोलिस भरतीतील कथित अन्यायामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या सोमनाथ वांगचुक यांच्या आंदोलनाला पक्षाने पाठिंबा जाहीर केला. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
कथित गैरव्यवहारात सहभागी कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करून भविष्यात सरकारी कामांपासून दूर ठेवावे, तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.


