नाशिक रोड परिसरातील सिन्नर फाटा येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक आरोग्य केंद्राची नाशिक महानगरपालिका प्रभाग सभापती रमेश धोंगडे यांनी अचानक पाहणी केली. या पाहणीदरम्यान अनेक कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्याने आरोग्य केंद्राच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत असलेल्या या आरोग्य केंद्राला सभापती रमेश धोंगडे यांनी सकाळी अचानक भेट देत कर्मचारी उपस्थिती, आरोग्य सेवा आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. पाहणीवेळी सकाळी पावणे दहा वाजेपर्यंतही काही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले.

या प्रकाराची गंभीर दखल घेत सभापतींनी तातडीने वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर आणि अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रात दाखल होत परिस्थितीची पाहणी केली.

नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. मनपा आरोग्य केंद्रांमध्ये सेवा व्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.