नाशिक :
नाशिकच्या धावपटू श्रावणी सांगळे हिने चीनमध्ये झालेल्या आशियाई अंडर-23 अॅथलेटिक्स स्पर्धेत दमदार कामगिरी करत दोन सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकावले आहे. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे भारतासह नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.
चीनमधील ऑर्डोस येथे आयोजित करण्यात आलेल्या आशियाई 23 वर्षांखालील अॅथलेटिक्स स्पर्धेत श्रावणीने मिश्र 4×400 मीटर रिले आणि महिला 4×400 मीटर रिले स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
याशिवाय, 400 मीटर अडथळा शर्यतीत श्रावणीने कांस्यपदक जिंकत स्पर्धेत एकूण तीन पदकांची कमाई केली. तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्रावणीच्या या यशामुळे राज्यातील युवा खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली असून, क्रीडा क्षेत्रात नाशिकचा डंका पुन्हा एकदा आशियाई स्तरावर वाजला आहे.


