हरणबारी धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरून वाहत असून परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. याच दरम्यान धरणाच्या सांडव्यात अडकलेली टायरची ट्यूब काढण्यासाठी विजय महादू सोनवणे हे पाण्यात उतरले होते.

मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात गेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी दुसरा एक तरुणही पाण्यात उतरला. मात्र तोदेखील पाण्याच्या प्रवाहात अडकला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोरीच्या साहाय्याने अडकलेल्या तरुणाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून धरण परिसरात वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे नागरिक आणि पर्यटकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.