नाशिकच्या अंबड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एक आरोपी आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत चार घरफोड्यांचा उलगडा झाला असून सोन्याचे-चांदीचे दागिने, मोबाईल, दुचाकी, रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अंबड गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना संशयित पल्सर दुचाकीवरील दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पळ काढल्याने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पडताळणी केली.

तपासात संशयितांनी एमआयडीसी बोर्ड परिसरातील तीन घरफोड्या तसेच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एका घरफोडीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय पल्सर दुचाकी चोरी केल्याचीही कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणात हर्षद माळी (वय 20) याला अटक करण्यात आली असून एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी चारही घरफोड्यांतील चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईमुळे चोरीच्या आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.