नाशिकमध्ये विकासकांनी दिलेल्या कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर फेरफार नोंदी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीत तब्बल ५१ गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले असून, १९७ संशयितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणात तत्कालीन मंडल अधिकारी अनिल रोकडे, तलाठी मनीषा पाटील, शशिकांत चितालकर आणि सागर शेलार यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करून तब्बल सात वर्षांच्या विलंबानंतर सादर करण्यात आलेल्या कथित बनावट नकाशांच्या आधारे फेरफार नोंदी मंजूर केल्याचा ठपका संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे महसूल विभागातील फेरफार नोंदी आणि संबंधित प्रशासकीय प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे.
आपलं नाशिक | आपला आवाज


