पिंपरी फाटा ते भाटगावदरम्यान कारला कट मारल्याच्या कारणावरून एका कुटुंबाला अडवून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी येवला तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
लासलगावहून श्रीरामपूर येथे औषधोपचारासाठी जात असताना संबंधित कुटुंबाची कार पिंपरी फाट्यावर अडवण्यात आल्याचा आरोप आहे. कारची चावी काढून घेत शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली. ‘तुम्ही आमच्या गाडीला कट मारला’ असे म्हणत जकारीया शेख यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर पोलिस ठाण्याकडे जात असताना भाटगाव परिसरात पुन्हा कार अडवण्यात आल्याचा आरोप आहे. यावेळी लाकडी दांडक्यांनी कारच्या काचा फोडण्यात आल्या. कुटुंबातील चौघांना मारहाण करण्यात आली असून, ४ हजार ६०० रुपयांची रोकड काढून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी जकारीया गफ्फार शेख यांनी येवला तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फोटो आणि व्हिडिओच्या आधारे संशयितांची नावे निष्पन्न झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


