नाशिकमधील कालिदास कला मंदिरात कलानंद कथक नृत्य संस्थेचा वार्षिक महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थेच्या ४७ व्या वर्षातील पदार्पणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'कथक विधा' या विशेष कार्यक्रमाला कला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भावपूर्ण 'गुरु वंदना'ने झाली. त्यांच्या आकर्षक सादरीकरणाने सभागृहातील वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या 'गोदावरी के राम' या विशेष कथक नृत्यरचनेने उपस्थितांची विशेष दाद मिळवली.

प्रभू रामांच्या नाशिकमधील वास्तव्यावर आधारित या नृत्यरचनेचे लेखन स्वानंद बेदरकर यांनी केले असून, संगीताची धुरा डॉ. ज्ञानेश्वर कासार यांनी सांभाळली. गुरु संजीवनी कुलकर्णी आणि डॉ. सुमुखी अथणी यांच्या नृत्यदिग्दर्शनामुळे सादरीकरण अधिक प्रभावी ठरले.

सुरेल संगीत, प्रभावी प्रकाशयोजना आणि कलाकारांच्या देखण्या सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रम संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित रसिकांनी कलाकारांचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले.