बीड शहरात बोगस डॉक्टरचा प्रकार उघडकीस आला आहे. संत भगवान बाबा चौक परिसरात ‘संजीवनी नस क्लिनिक’च्या नावाखाली क्लिनिक सुरू करून रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. ऋषिकेश कानडे या व्यक्तीकडे आवश्यक वैद्यकीय शिक्षण आणि पात्रता नसतानाही तो रुग्णांवर उपचार करत असल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाची दखल घेत आरोग्य विभागाने कारवाई केली असून, संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरोधात तपासणी मोहीम राबवली जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अशा प्रकरणांमध्ये प्रशासनाकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.