मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या महाराष्ट्रातील कामाला महत्त्वाची गती मिळाली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील दिवे-अंजूर गावाजवळ मुंबई-नाशिक महामार्गावरील NH-3 वर १०० मीटर लांबीचा स्टील पूल यशस्वीपणे बसवण्यात आला आहे. महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी पूर्ण झालेला हा पहिला स्टील पूल असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.
या पुलाचे वजन तब्बल १ हजार ४०५ मेट्रिक टन असून त्याची उंची आणि रुंदी प्रत्येकी १४ मीटर आहे. पुलाची स्टील संरचना तामिळनाडूतील त्रिची येथे तयार करण्यात आली. त्यानंतर सुमारे १,३०० किलोमीटरचा प्रवास करून ही संरचना भिवंडीतील बांधकामस्थळी आणण्यात आली आणि तेथे तिची जोडणी करून निर्धारित ठिकाणी बसवण्यात आली.
महामार्गावरील वाहतुकीला कमीत कमी अडथळा निर्माण व्हावा यासाठी पुलाच्या लॉन्चिंगचे काम रात्रीच्या वेळी वाहतूक ब्लॉक घेऊन करण्यात आले. १०० मीटर लांबीची ही रचना तात्पुरत्या ट्रेसल्सवर सुमारे १७.५ मीटर उंचीवर जोडण्यात आली. यासाठी २२ स्किड अरेंजमेंट्स आणि ५४,०७६ उच्च-शक्तीचे टॉर-शिअर बोल्ट वापरण्यात आले. त्यानंतर दोन १५० मेट्रिक टन क्षमतेच्या हॉलो जॅक्सच्या साहाय्याने पूल निर्धारित ठिकाणी सरकवून बसवण्यात आला.
पुलाच्या टिकाऊपणासाठी C5 संरक्षक रंगकाम प्रणाली आणि कंपन नियंत्रणासाठी इलॅस्टोमेरिक बेअरिंग्जचा वापर करण्यात आला आहे. महामार्ग, एक्स्प्रेसवे, मोठ्या नद्या किंवा रेल्वे मार्गांवर जास्त लांबीचा स्पॅन आवश्यक असताना अशा स्टील पुलांचा वापर केला जातो.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी एकूण २८ स्टील पूल प्रस्तावित असून, त्यापैकी १६ पुलांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे भिवंडीतील दिवे-अंजूर येथे उभारण्यात आलेला हा पूल प्रकल्पाच्या महाराष्ट्रातील बांधकामाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.


