नाशिक शहरातील वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आता हा मुद्दा थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक दौऱ्याशी जोडला गेला आहे. शहरातील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या आरोग्याचा विचार करून त्यांचा नियोजित दौरा रद्द करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विद्यासागर घुगे यांनी केली आहे.
विद्यासागर घुगे यांनी यासंदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ई-मेल पाठवला आहे. नाशिकमधील वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करत त्यांनी राष्ट्रपतींचा दौरा रद्द करण्याची मागणी केली आहे.
नाशिकमध्ये विविध विकासकामे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील हालचाली वाढल्या आहेत. मात्र, त्याचवेळी प्रदूषणाचा प्रश्नही महत्त्वाचा ठरत आहे. शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रपतींच्या दौऱ्याचा संदर्भ देत हा मुद्दा पुढे आणला आहे.
दरम्यान, विद्यासागर घुगे यांनी केलेली ही मागणी असून, त्यावर प्रशासन किंवा संबंधित यंत्रणांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रपतींचा नाशिक दौरा रद्द होणार की नियोजित कार्यक्रमानुसार पार पडणार, याबाबत अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे.


