ठाण्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत असताना पोलीस निरीक्षक संजय नलावडे यांची अचानक प्रकृती बिघडली. नलावडे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासोबत कर्तव्यावर तैनात होते. साकेत हेलिपॅड परिसरात ते अचानक चक्कर येऊन कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
घटना लक्षात येताच एकनाथ शिंदे यांनी तातडीने नलावडे यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णवाहिकेत दाखल केल्यानंतर ती रुग्णवाहिका ज्युपिटर रुग्णालयात नेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर नलावडे यांना उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन मिरवणुका आणि भाविकांची गर्दी असल्याने पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अशाच बंदोबस्ताच्या कर्तव्यादरम्यान संजय नलावडे यांची प्रकृती बिघडल्याची घटना घडली.
उपलब्ध माहितीनुसार, नलावडे यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारीही रुग्णालयात पोहोचले असून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत आहेत.
या घटनेनंतर गणेश विसर्जनाच्या दिवशी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरील जबाबदारी आणि ताण पुन्हा अधोरेखित झाला आहे. दरम्यान, नलावडे यांच्या प्रकृतीबाबत पुढील वैद्यकीय अपडेटकडे लक्ष लागले आहे.


