नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील साईनाथ नगर चौकात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अनेक दिवसांपासून वाहतूक सिग्नल बंद असल्याने वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
साईनाथ नगर चौक हा परिसरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून, सिग्नल बंद असल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. चौकात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी केवळ वाहतूक वॉर्डन कार्यरत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवताना अडचणी निर्माण होत आहेत.
याशिवाय चौकासह परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका वाढल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बंद पडलेले वाहतूक सिग्नल तातडीने सुरू करावेत, चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.


