नाशिक जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या ताफ्यासमोर पिंपळगाव परिसरात दोन ट्रकचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, एका ट्रकचे टायर फुटल्यानंतर चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला.
अपघातानंतर ट्रकमध्ये चालक, क्लिनरसह काही जण अडकल्याचं निदर्शनास आलं. हे लक्षात येताच गिरीश महाजन यांनी आपला ताफा थांबवून घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्वतः ट्रकवर चढून अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी बचावकार्यात मदत केली. यावेळी उपस्थित नागरिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही मदतकार्य केलं.
जखमींना बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आलं. घटनास्थळी उपस्थित प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महाजन यांनी आवश्यक सूचना दिल्या. या वेळी आमदार गोकुळ गीते आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
या अपघातामुळे दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाहणीसाठी सुरू असलेला महाजन यांचा दौरा काही काळ थांबला. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी बचावकार्याला प्राधान्य देण्यात आलं.


