नाशिक : नाशिक जिल्ह्यात एसआयआर नमुना अर्जांचे वितरण सुरू असताना अर्जांच्या डिजिटायझेशनचे काम अपेक्षित गतीने होत नसल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चार दिवसांत १०० टक्के डिजिटायझेशन पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेऊन कामाचा वेग वाढवण्याचे आदेश दिले. मंगळवारपर्यंत ४३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून उर्वरित ५७ टक्के काम युद्धपातळीवर सुरू आहे.
बीएलओ आणि संबंधित यंत्रणा मिशन मोडवर कार्यरत असून फोटो पडताळणी, सिमिलर एन्ट्रीज तपासणी तसेच मतदार यादी शुद्धीकरणाचे काम सुरू आहे.
अपूर्ण माहिती असलेले अर्ज आणि इतर राज्यांतील मतदारांची माहिती असलेल्या अर्जांमुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्या तरी त्रुटीमुक्त मतदार यादी तयार करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.


