नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची तयारी नाशिकमध्ये अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंड परिसरात ऐतिहासिक सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी दीड ते दोन लाख भाविक आणि नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सोहळ्याला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आलं आहे. प्रत्यक्ष ध्वजारोहणाच्या ठिकाणी पोहोचणं शक्य न होणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना सोहळा पाहता यावा, यासाठी रामकुंड परिसरात सुमारे दीड किलोमीटरच्या क्षेत्रात ठिकठिकाणी लाईव्ह स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.
या स्क्रीनच्या माध्यमातून ध्वजारोहण सोहळ्याचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहता न आलेल्या नागरिकांनाही परिसरातून ऐतिहासिक सोहळा पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रशासनाकडून विविध व्यवस्था करण्यात येत आहेत. भाविकांची संभाव्य गर्दी आणि सोहळ्याचं महत्त्व लक्षात घेऊन नियोजनाला वेग आला आहे.


