नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची उत्सुकता नाशिकमध्ये शिगेला पोहोचली आहे. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरात होणाऱ्या गोदा आरतीला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी गोदा आरतीला विशेष स्वरूप प्राप्त झालं. नाशिकसह बाहेरगावाहूनही मोठ्या संख्येने भाविक आरतीसाठी रामकुंड परिसरात दाखल झाले. विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला असून, आकर्षक रोषणाई आणि गोदा आरतीच्या भक्तिमय वातावरणामुळे परिसरात उत्साहाचं चित्र पाहायला मिळालं.
दरम्यान, गोदावरीच्या पाणीपातळीतही वाढ झाल्याचं दिसून आलं. ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरातील धार्मिक वातावरण आणि भाविकांची उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे.


