नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरात स्वच्छता आणि सुशोभीकरणाची कामं सुरू आहेत. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. मात्र, या सोहळ्याच्या तयारी दरम्यान गोदावरी नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न समोर आला आहे.

 

रामकुंड परिसरातील निळकंठेश्वर महादेव मंदिरासमोर दूषित सांडपाणी थेट गोदावरी नदीपात्रात मिसळत असल्याचं चित्र दिसून आलं आहे. दुतोंड्या मारुती परिसरातही नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे ध्वजारोहण सोहळ्यासाठी परिसर सजवण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे नदीपात्रात सांडपाणी मिसळत असल्याने परिस्थितीकडे लक्ष वेधलं जात आहे.

 

या परिसरात येणारे काही पर्यटक दूषित पाण्याने तोंड धूत असल्याचंही दिसून आलं. त्यामुळे दूषित पाण्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी नदीपात्रात मिसळणारं सांडपाणी रोखण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना करणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.