नाशिकरोड बसस्थानकाची दुरवस्था प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. बसस्थानक परिसरात मोठमोठे खड्डे, साचलेले पाणी आणि चारही बाजूंनी रिक्षांचा विळखा असल्याने प्रवासी, वाहनचालक आणि बसचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

नाशिकरोड बसस्थानकातून दररोज एसटी आणि सिटीलिंकच्या सुमारे ५०० बसच्या हजाराहून अधिक फेऱ्या होतात. त्यामुळे बसस्थानक परिसरात दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि प्रवाशांची वर्दळ असते.

मात्र, बसस्थानकातील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे बस तसेच इतर वाहनांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत.

बसस्थानकाच्या परिसरात रिक्षांची गर्दी असल्याने प्रवाशांना आणि वाहनचालकांना मार्ग काढताना अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, बसस्थानकाच्या काँक्रिटीकरणाची निविदा प्रक्रिया आठ महिन्यांपूर्वी पूर्ण झाली आहे. मात्र, प्रत्यक्ष काँक्रिटीकरणाचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर बसस्थानकातील मूलभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

मोठा अपघात होण्यापूर्वी बसस्थानकाचे तातडीने काँक्रिटीकरण करावे, तसेच परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.