नाशिक शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू आणि इतर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. जुलै महिन्याच्या अवघ्या २१ दिवसांत २२ जणांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद झाली असून संशयित रुग्णांची संख्या २६० वर पोहोचली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जुलै महिन्यात डेंग्यूसदृश आजाराचे २३८ रुग्ण आढळले होते. तपासणीनंतर त्यापैकी २२ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे यंदाच्या वर्षातील शहरातील एकूण डेंग्यूबाधितांची संख्या ४५ वर पोहोचली आहे.

डेंग्यूचा प्रसार एडिस इजिप्ती या मादी डासामुळे होतो. घराजवळ साचलेले स्वच्छ पाणी, टाकाऊ टायर, फुलांच्या कुंड्या आणि भंगारामध्ये या डासांची पैदास वाढत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवून पाणी साचू न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, शहरात चिकनगुनियाचेही दोन नवे रुग्ण आढळले असून यंदाच्या वर्षातील एकूण रुग्णसंख्या पाच झाली आहे. संशयित चिकनगुनिया रुग्णांचा आकडा ६२४ वर पोहोचला आहे.

शहरात डासांचा उपद्रव वाढल्याच्या तक्रारी वाढत असताना महापालिकेच्या धूरफवारणी मोहिमेवरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डास निर्मूलनासाठी प्रत्यक्ष आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.