नाशिक : शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाने राबवलेल्या विशेष सर्वेक्षणातून ३५ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. यामध्ये २२ मुली आणि १३ मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील ३४ मुलांनी यापूर्वी कधीही शाळेचे तोंड पाहिले नव्हते.
श्रमिक आणि स्थलांतरित कामगारांच्या वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच सिग्नल, चौक, रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक परिसरातही शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला.
सर्वेक्षणातून आढळलेल्या या ३५ मुलांना आता जवळच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षणापासून दूर असलेल्या मुलांना पुन्हा शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.
श्रमिक आणि स्थलांतरित कुटुंबांतील मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे, या उद्देशाने महापालिकेने विशेष पुढाकार घेतला आहे.
शिक्षणापासून एकही मूल वंचित राहू नये, यासाठी अशा प्रकारचे सर्वेक्षण आणि प्रवेश प्रक्रिया महत्त्वाची ठरत आहे.
आपलं नाशिक | आपला आवाज


