गोदावरी नदीतील प्रदूषण आणि नदीपात्रातील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक महापालिका आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गोदावरी नदीच्या पाण्याचे नमुने संकलित केले आहेत. या प्रक्रियेदरम्यान जनहित याचिकाकर्ते राजेश पंडित हेही उपस्थित होते.

उच्च न्यायालयाने यापूर्वी गोदावरी प्रदूषणाबाबत नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांच्या उपस्थितीतच पाण्याचे नमुने घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नंदिनी संगम, तपोवन आणि दसक या तीन ठिकाणांहून पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले. सध्या गोदावरीला पूर आल्याने गढूळ पाण्यातून हे नमुने घेण्यात आले आहेत.

याचिकाकर्ते राजेश पंडित यांच्या मते, पुराच्या पाण्यामुळे नदीतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने प्रयोगशाळेतील अहवालावर त्याचा परिणाम होऊ शकतो. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सोमेश्वर ते दसक पंचक दरम्यान नदीपात्रातील मातीचे भराव आणि कथित अनधिकृत अतिक्रमणाचाही मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. संकलित नमुन्यांचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार असून, मंगळवारी होणाऱ्या पुढील सुनावणीत न्यायालय कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.