नाशिकमधील एक्सलो पॉईंट परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. एमआयडीसी परिसर असल्याने या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात कामगार, वाहनचालक आणि नागरिकांची वर्दळ असते. मात्र रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढल्याची चिंता आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
आंदोलनादरम्यान साहेबराव दातीर यांनी प्रशासनावर टीका करत रस्ते कामांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप केला. काही रस्त्यांची कामे अनेक महिन्यांपासून सुरू असून नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
याच परिसरात यापूर्वी खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात निलेश कोतकर यांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख करत, भविष्यात पुन्हा अशा प्रकारची जीवितहानी झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रशासनाने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.


