नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामांमुळे खोदलेल्या रस्त्यांवर झालेल्या अपघातांची दखल राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्यात आली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

अलीकडे झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून अपघाताची कारणे आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

मंत्री महाजन यांनी, चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. दोषी अधिकारी अथवा संबंधित ठेकेदार कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, शनिवारी नाशिकमध्ये होणाऱ्या बैठकीत कुंभमेळ्याच्या कामांसह रस्त्यांवरील अपघातांच्या मुद्द्यावर चर्चा होणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.