नाशिक : नाशिक शहरात डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 18 वर्षीय खुशी भट या तरुणीचा डेंग्यूमुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, खुशीच्या बहिणीवरही डेंग्यूची लागण झाल्याने तिच्यावर सध्या ICUमध्ये उपचार सुरू आहेत. एकाच कुटुंबातील दोन मुलींवर डेंग्यूमुळे ही गंभीर परिस्थिती ओढावल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील डास नियंत्रण आणि धूरफवारणीच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. प्रशासनाकडून होणारी धूरफवारणी केवळ नावापुरतीच होत असल्याचा आरोप सभापती समाधान देवरे यांनी केला आहे. नाशिक महापालिकेच्या महासभेत त्यांनी बेस्ट कंट्रोल विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले.
डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने डास नियंत्रणाच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची मागणी होत आहे. परिसरात नियमित धूरफवारणी, डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे या उपाययोजनांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाकडून डेंग्यू नियंत्रणासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


