नाशिक शहरात पावसानंतर साथीच्या आजारांचा धोका वाढू लागला आहे. रस्ते खोदकाम आणि पावसामुळे अनेक भागांत पाणी साचत असून डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.
काही भागांमध्ये सांडपाण्याची समस्या आणि अस्वच्छतेमुळे कावीळ, टायफाईड, अतिसार यांसारख्या जलजन्य आजारांचाही धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये तसेच आठवड्यातून एक दिवस 'ड्राय डे' पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
ताप, अंगदुखी किंवा आजाराची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे. स्वच्छता, सतर्कता आणि वेळेवर उपचार या त्रिसूत्रीने साथीच्या आजारांपासून बचाव करता येणार आहे.


