नाशिक : सणासुदीच्या काळात बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे आणि विविध कार्यक्रमांमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेता नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव चिंतेचा विषय बनला आहे. सप्टेंबर महिन्यात शहरात तब्बल १९२ नव्या स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षातील स्वाईन फ्लू बाधित रुग्णांची संख्या ३५९ वर पोहोचली आहे.

स्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबतच या आजारामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा होत असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, स्वाईन फ्लूसोबतच डेंग्यूचेही १८२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नाशिक महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला असून, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

सणासुदीच्या काळात नागरिकांची गर्दी वाढणार असल्याने ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे. स्वच्छता राखणे, गर्दीच्या ठिकाणी आवश्यक काळजी घेणे आणि आजाराची लक्षणे जाणवल्यास वेळेत तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाशिकचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला असून, सणासुदीच्या काळात आरोग्य व्यवस्थेसमोरील आव्हान वाढले आहे.

अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपलं नाशिकला Subscribe करा आणि Bell Icon दाबा.