नाशिक शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरातील अनेक CCTV कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

काही ठिकाणी CCTV कॅमेऱ्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ साचलेली दिसत असून, काही कॅमेरे खराब अवस्थेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली महत्त्वाची यंत्रणाच काही ठिकाणी ठप्प असल्याचा आरोप होत आहे.

गुन्हा घडल्यानंतर तपासासाठी CCTV फुटेज महत्त्वाचे ठरते. मात्र कॅमेरे बंद असल्यास पोलिसांना घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे मिळवताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मोठा खर्च करून उभारण्यात आलेल्या या CCTV यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीवरही नागरिकांकडून सवाल उपस्थित होत आहेत.

शहरातील प्रमुख चौक आणि संवेदनशील ठिकाणांवरील CCTV कॅमेरे तातडीने तपासून बंद असलेली यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.