नाशिकच्या सिडको परिसरातील स्वामी विवेकानंद नगर येथे ड्रेनेज लाईन तुंबल्याने गेल्या दोन दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ड्रेनेज तुंबल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांची वाढ होण्याची तसेच संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
या समस्येबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून समस्या तातडीने सोडवण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, लवकरात लवकर ड्रेनेजची दुरुस्ती करून सांडपाण्याचा निचरा करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.


