नाशिकच्या वडाळा नाका परिसरातून चोरीला गेलेल्या एका रिक्षेचा पंधरा दिवस उलटूनही अद्याप शोध लागलेला नाही. रिक्षा मालक नईम समद शेख यांनी सीसीटीव्ही फुटेजसह आवश्यक पुरावे भद्रकाली पोलिसांकडे दिल्याचा दावा केला असूनही तपासात कोणतीही ठोस प्रगती झालेली नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
नईम शेख यांची रिक्षा 14 जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी वडाळा नाका परिसरातून चोरी केली. घटनेनंतर त्यांनी तात्काळ भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासासाठी आवश्यक सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.
मात्र, 15 दिवस उलटूनही रिक्षेचा मागमूस लागलेला नसल्याचा आरोप रिक्षा मालकाने केला आहे. पोलिसांकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्यामुळे त्यांनी तपासाच्या गतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
रिक्षा हेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्याने चोरीनंतर कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे रिक्षा तातडीने शोधून काढावी आणि संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नईम शेख यांनी केली आहे.
तसेच, संबंधित रिक्षेबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास भद्रकाली पोलिसांशी किंवा रिक्षा मालकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


