नाशिक तालुक्यातील वंजारवाडी येथे किरकोळ शाब्दिक वादाचे रूप जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात 27 वर्षीय विश्वास रोकडे गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला आठ टाके पडले आहेत. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (25 जुलै) दुपारच्या सुमारास झालेल्या शाब्दिक वादानंतर विश्वास रोकडे याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर तो गंभीर जखमी होऊन घटनास्थळी कोसळला. त्याच्या मित्रांनी तत्काळ त्याला देवळाली कॅम्प येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

उपचारादरम्यान जखमीच्या डोक्याला आठ टाके घालावे लागले. या प्रकरणी यश परदेशी आणि शुभम परदेशी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून देवळाली कॅम्प पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, या हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी जखमी विश्वास रोकडे यांनी केली आहे.