वाहनाचा अपहार करून सुमारे १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-२ ने मालेगावातून एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीला पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वाहन अपहार प्रकरणाचा तपास सुरू असताना गुन्हेशाखा युनिट-२ ला आरोपी मालेगावातील राजानगर परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ४५ वर्षीय जुनेद मोहम्मद अब्दुल हमीद याला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने तक्रारदाराचा विश्वास संपादन करून टेम्पो हप्त्यांवर घेतला. मात्र, त्यानंतर हप्ते न भरता वाहनाचा अपहार करून सुमारे १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.


