गोंदिया जिल्ह्यातील लंबाटोला येथील प्राथमिक शाळेत तीन अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप एका शिक्षकावर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक शाळेतील शिक्षक संजय अग्रवाल याच्यावर तीन विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती समोर आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रावणवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (POCSO) कायद्यानुसार गुन्हा नोंदवत आरोपी शिक्षकाला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, संबंधित शिक्षकाविरुद्ध यापूर्वीही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी शिक्षकाला तात्काळ निलंबित केले आहे.

या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.