नाशिक शहरातील शालेय वाहतूक व्यवस्थेवरून वाहतूकदार आणि आरटीओ प्रशासनामध्ये वाद निर्माण झाला आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे तसेच नियमांची पूर्तता असतानाही स्कूल बस आणि रिक्षाचालकांवर अवाजवी दंडात्मक कारवाई केली जात असल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला आहे.

या कारवाईच्या निषेधार्थ आज शहरातील शालेय वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्या-येण्याच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेने या कारवाईविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. वाहतूकदारांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. त्यानुसार तब्बल २ हजार स्कूल बस आणि रिक्षा आरटीओ कार्यालयात जमा करून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांवर अन्यायकारक कारवाई होऊ नये, तसेच दंडात्मक कारवाईबाबत योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, शालेय वाहतूक बंद राहिल्यास पालक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रशासनाने आणि वाहतूकदारांनी चर्चेतून तोडगा काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.