आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर साक्री आणि शिरपूर तालुक्यातील ६४ विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज दुसरा दिवस असून, विद्यार्थ्यांना दुसऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तातडीने प्रवेश देण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर शासनाने या शाळेची मान्यता रद्द केली. मात्र शाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पालकांनी आदिवासी प्रकल्प अधिकारी तसेच आदिवासी आयुक्त, धुळे यांच्याकडे वारंवार निवेदने दिली आहेत. मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने पालकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

६४ विद्यार्थ्यांचे दुसऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत समायोजन करण्यात यावे आणि त्यांचे शिक्षण सुरळीत सुरू करावे, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.