नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील खड्डे बुजवण्यासाठी दिलेली आठवडाभराची मुदत संपली असली, तरी अनेक रस्त्यांवरील परिस्थिती जैसे थेच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाशिककरांना खड्ड्यांतून कधी मुक्ती मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. काही ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी माती-मुरूमाचा वापर करण्यात आला, मात्र पावसामुळे ही तात्पुरती डागडुजी पुन्हा खराब झाली आहे.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील खड्डे एका आठवड्यात बुजवण्याचे निर्देश दिले होते. प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याची मोहीम राबवण्यात आली, मात्र अनेक भागांमध्ये अजूनही रस्त्यांची अवस्था खराबच असल्याचा आरोप होत आहे.
खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्डे चुकवताना वाहनांचा तोल जाण्याची शक्यता वाढली असून अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. दुचाकीस्वारांना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे चित्र आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढत असून नागरिकांकडून कायमस्वरूपी रस्ते दुरुस्तीची मागणी केली जात आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार काम करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
महाजनांच्या अल्टिमेटमनंतरही अपेक्षित बदल न झाल्याने आता प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. खड्डे बुजवण्याचा दावा प्रत्यक्ष रस्त्यांवरील परिस्थितीत कितपत उतरतो, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.


