मुंबईतील बोरिवली पूर्व परिसरातील ओधवनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन दरबाराचा भव्य देखावा साकारला आहे. मंडळाच्या २५व्या वर्षानिमित्त उभारण्यात आलेला हा देखावा नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे.
या शिवकालीन दरबारासोबत मंडळाच्या वतीने ऐतिहासिक शस्त्रांचं अनोखं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नवीन पिढीला शिवरायांचा इतिहास, त्यांचा पराक्रम आणि शिवकालीन शौर्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे यंदाची गणेशमूर्तीही पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करण्यात आली आहे. कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती साकारण्यात आली असून, संपूर्ण देखाव्यासाठीही पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
मंडळाचे संस्थापक निषाद राय यांच्या म्हणण्यानुसार, मंडळाच्या २५व्या वर्षानिमित्त हा विशेष देखावा उभारण्यात आला आहे. नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचा पराक्रम समजावा, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.
शिवकालीन दरबाराची भव्य प्रतिकृती, ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती यामुळे ओधवनगर मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरत आहे.


