जागतिक आदिवासी दिनानिमित्त मनमाड रेल्वे वर्कशॉपमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी वृक्षपूजन करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच आदिवासी समाजाच्या हक्कांच्या रक्षणासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प करण्यात आला.
मनमाड रेल्वे वर्कशॉपमधील टाईम बूथजवळ वृक्षपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सहाय्यक कारखाना प्रबंधक राम नारायण राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पर्यावरणाचे संवर्धन आणि वृक्षांचे महत्त्व याबाबत यावेळी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान जननायक बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आदिवासी समाजाच्या हक्कांच्या रक्षणाचा संकल्प करण्यात आला.
या कार्यक्रमाला विविध रेल्वे कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि आदिवासी समाजाच्या हक्कांबाबत जनजागृती करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पंढरीनाथ पठारे यांनी केले, तर विनोद खरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रेल्वे कर्मचारी आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


