स्वातंत्र्यदिनाची सुट्टी, शनिवार आणि त्यानंतरचा रविवार अशा सलग सुट्ट्यांमुळे नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तश्रृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी झाली. सकाळपासूनच सप्तश्रृंगी गडाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने पायथ्यापासून गडापर्यंत तब्बल ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
घाटातील सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. परिणामी वाहनांचा वेग मंदावला आणि वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. अनेक भाविकांना तब्बल २ ते ३ तास वाहनांमध्येच अडकून राहावे लागले.
सुट्टीच्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र, त्याचवेळी घाटातील रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू असल्याने वाहतुकीचे नियोजन करणे प्रशासनासमोर आव्हान ठरले. एकेरी वाहतुकीमुळे वाहनांच्या रांगा वाढत गेल्या आणि काही वेळातच या रांगा तब्बल ५ किलोमीटरपर्यंत पोहोचल्या.
लहान मुले, वृद्ध आणि महिला भाविकांना या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला. काही भाविकांनी बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर दर्शनाचा निर्णयही रद्द केल्याचे सांगण्यात आले.
वाहतूक कोंडी पार करून भाविक गडावर पोहोचल्यानंतरही त्यांची प्रतीक्षा संपली नाही. रोपवे ट्रॉलीसाठी तब्बल २ ते ३ तासांचे वेटिंग असल्याने भाविकांना पुन्हा रांगेत उभे राहावे लागले.
त्यामुळे अनेक भाविकांचा संपूर्ण दिवस प्रवास, वाहतूक कोंडी आणि प्रतीक्षेतच गेला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये या परिस्थितीबाबत नाराजी पाहायला मिळाली.
सण आणि सुट्टीच्या दिवशी घाटातील काँक्रीटीकरणाचे काम तात्पुरते थांबवावे किंवा वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि भाविकांकडून करण्यात आली आहे.
तसेच गर्दीच्या काळात रोपवेच्या फेऱ्या वाढवाव्यात आणि वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलिस कर्मचारी तैनात करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
सप्तश्रृंगी गडावर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता आगामी सुट्ट्या आणि सणांच्या काळात प्रशासनाकडून वाहतुकीचे योग्य नियोजन केले जाणार का, याकडे आता भाविकांचे लक्ष लागले आहे.


