मुंबई : ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा चटका जाणवत असतानाच महाराष्ट्रातील काही भागांत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या विस्तारित अंदाजानुसार, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि राज्याच्या काही भागांत पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील संभाव्य हवामान प्रणालींमुळे या अंदाजाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पंधरा ते अठरा ऑक्टोबरदरम्यान दक्षिण भारतातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. अठरा ऑक्टोबरच्या आसपास पावसाची प्रणाली उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांवर होऊ शकतो. मात्र, पावसाचे नेमके ठिकाण आणि तीव्रता याबाबत पुढील अंदाज महत्त्वाचे ठरणार आहेत.

पंधरा ते बावीस ऑक्टोबर या पहिल्या आठवड्यात दक्षिण भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच काळात देशाच्या आग्नेय द्वीपकल्पीय भागात ईशान्य मोसमी पावसालाही सुरुवात झाली आहे. 22 ते 29 ऑक्टोबरदरम्यान केरळ आणि तामिळनाडूमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचे संकेत आहेत. याशिवाय कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी पावसाने संपूर्ण देशातून माघार घेतली आहे. मात्र, त्यानंतरही काही भागांत पावसाची शक्यता कायम आहे.