नाशिक : निफाड तालुक्यातील देवगाव येथे प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी सरण रचून अनोखे आंदोलन करत विमा कंपनीविरोधात घोषणाबाजी केली.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे सोयाबीन, मका, टोमॅटो आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, ‘उत्पन्नात घट नाही’ हे कारण देत अनेक शेतकऱ्यांचे पीकविमा दावे फेटाळण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी सरसकट पीकविमा मंजूर करून नुकसानभरपाई तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली. तसेच पीकविमा प्रक्रियेतील कथित त्रुटींची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.