नाशिक : संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात राज्यभरात कमाल तापमानाची नोंद झाली असून, उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, महिनाअखेरीस वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता असून राज्यात पुन्हा पावसाचे संकेत मिळाले आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात राज्यातील विविध भागांत तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची प्रणाली अधिक तीव्र होऊन तिचे चक्रीवादळात रूपांतर होत आहे. ही प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने सरकत असल्याने २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान विदर्भात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर २८ ऑक्टोबर रोजी विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याला 'ऑरेंज अॅलर्ट' जारी करण्यात आला असून, येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना 'यलो अॅलर्ट' देण्यात आला आहे.

दुसरीकडे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. विशेषतः नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील घाट परिसराला बुधवारी आणि गुरुवारी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी ३० ते ४० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.