डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात आरोपी असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे यांची कारागृहातून सुटका झाली आहे. हायकोर्टाने घातलेल्या अटींची पूर्तता केल्यानंतर म्हात्रे यांना कारागृहातून बाहेर सोडण्यात आले.

सुटकेनंतर रमेश म्हात्रे महाराष्ट्राबाहेर रवाना झाले असून त्यांनी गोव्याचा मार्ग धरला आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार त्यांच्यावर महाराष्ट्रात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काळात ते गोव्यातच मुक्काम करणार आहेत.

डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणातील पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, चार्जशीट दाखल होईपर्यंत गोव्यात राहण्याची अट असल्याची माहिती समोर आली आहे.

रमेश म्हात्रे यांचे वकील अॅड. मुजाहिद काजी यांनी हायकोर्टाच्या अटींची पूर्तता केल्यानंतर म्हात्रे यांची सुटका झाल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील पुढील न्यायालयीन घडामोडींकडे आता लक्ष लागले आहे.