इगतपुरी शहरातील गिरणारे परिसरात मुख्य रस्त्यालगत भला मोठा धोकादायक खड्डा निर्माण झाला आहे. सुमारे ३० बाय ३० फूट आकाराचा आणि ६ ते ७ फूट खोल असलेला हा खड्डा सध्या पाण्याने भरला आहे.
खड्डा मुख्य रस्त्यालगत असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसाठी धोका निर्माण झाला आहे. पाण्यामुळे खड्ड्याची खोली आणि त्याची नेमकी स्थिती लक्षात येणे कठीण होत आहे.
खड्ड्यालगतच पंचायत समितीचे कार्यालय असल्याने परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे दिवसा तसेच रात्रीच्या वेळी या ठिकाणी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना पाण्याने भरलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्यास अपघात होण्याची शक्यता आहे.
या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नगरसेवक रोहिदास डावखर यांनी हा खड्डा तातडीने बुजवावा, अशी मागणी केली आहे.
खड्डा बुजवणे शक्य नसल्यास त्याठिकाणी संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणीही रोहिदास डावखर यांनी केली आहे.


