कळवण तालुक्यातील आंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरुळ आणि अंबापूर परिसराला पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

रात्री १२ वाजून ०६ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला धक्का नोंदवण्यात आला.

यानंतर पहाटे ५ वाजून ३२ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्का जाणवला.

सलग दोन धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, काही काळ वीजपुरवठाही खंडित झाल्याची माहिती आहे.

मुसळधार पावसामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी झिरपल्याने भूगर्भातील हालचाली वाढल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मात्र या कारणाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

तज्ज्ञांच्या मते हे धक्के सौम्य स्वरूपाचे असले तरी नागरिक आणि प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे.