नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बसस्थानकासमोरील एका वडापाव सेंटरला बुधवारी रात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत सेंटरमधील फ्रिज, टेबल, खाद्यसाहित्य आणि इतर साहित्य जळून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
घटनास्थळी गॅस सिलेंडर असल्याने आगीचे स्वरूप अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, जवळील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत गॅस सिलेंडर वेळेत सुरक्षित ठिकाणी हलवला. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे टँकर, पोलीस पथक आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने तत्काळ आग आटोक्यात आणली. तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील वीजपुरवठा तातडीने बंद करून बचावकार्याला सहकार्य केले.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.


