महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सिंग फेडरेशनच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील सरकारी परिचारिकांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दोन तासांचे कामबंद आंदोलन केले. राज्यातील विविध जिल्हा शाखांनी या आंदोलनात सहभाग नोंदवत सरकारकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
आंदोलनादरम्यान सेवा प्रवेश नियमांमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, परिचारिका संवर्गाचा आकृतीबंध सुधारित करावा तसेच राज्यभरातील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. या प्रश्नांमुळे आरोग्य यंत्रणेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले.
राज्यातील सर्व जिल्हा शाखांनी एकत्रितपणे आंदोलनात सहभागी होत शासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. परिचारिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मागण्यांवर समाधानकारक निर्णय न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सिंग फेडरेशनने दिला आहे.


