नांदेड :
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या पात्र आंदोलकांच्या वारसांना शासनाकडून जाहीर करण्यात आलेली प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत नांदेडमध्ये वितरित करण्यात आली. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते लोहा तालुक्यातील तीन कुटुंबीयांना मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. त्यानुसार लोहा तालुक्यातील लोंढे सांगवी, वाका आणि धनज येथील तीन पात्र कुटुंबीयांना ही मदत प्रदान करण्यात आली.
यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केल्याची माहिती दिली. तसेच, मराठा समाजाने आरक्षणासाठीचा लढा शांततेच्या आणि संयमाच्या मार्गाने सुरू ठेवावा, कोणत्याही तरुणाने टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
शासनाकडून पीडित कुटुंबांना आवश्यक ती मदत आणि अन्य मागण्यांसाठी पुढेही प्रयत्न सुरू राहतील, असेही चिखलीकर यांनी स्पष्ट केले.


