नाशिकच्या तपोवन रोड परिसरातील अशोक सोनजे मार्गावर आज सकाळी एका तरुणाने नंदिनी नदीत उडी मारल्याची घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर भद्रकाली पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
नदीकिनारी उभी असलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून संबंधित तरुणाची ओळख विजय पिठे (रा. पवारवाडी, जेलरोड) अशी पटली. तो खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने नदीत शोधमोहीम सुरू केली असून नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. संबंधित तरुणाचा शोध सुरू असून घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणी भद्रकाली पोलीस पुढील तपास करत असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.


