नाशिकच्या महामार्ग बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये उभी असलेल्या एका विदेशी बनावटीच्या दुचाकीला अचानक आग लागल्याने काही काळ खळबळ उडाली. स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत अग्निशामक सिलेंडरच्या साहाय्याने आग काही मिनिटांत आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
शनिवारी सायंकाळी एमएच १२ एसपी २९०० क्रमांकाच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.
कर्मचाऱ्यांनी अग्निशामक सिलेंडरचा वापर करून आग नियंत्रणात आणली. त्यामुळे परिसरातील इतर वाहनांपर्यंत आग पसरण्याचा धोका टळला.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.


